मुंबई (Pclive7.com):- पुणे महानगरपालिकेच्या सुमारे ३० कोटी रुपयांच्या वृक्षगणना कंत्राटाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. आमदार अमित गोरखे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत, पूर्वी मिळकत कर सर्वेक्षणाच्या कामात त्रुटी आढळलेल्या कंपनीलाच वृक्षगणनेचे कंत्राट देण्यात आल्याबाबत शासनाकडे खुलासा मागितला.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मिळकत कर सर्वेक्षण आणि वृक्षगणनेची कामे वेगवेगळ्या कालावधीत व स्वतंत्र निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात आली आहेत. मिळकत कर सर्वेक्षणात त्रुटी आढळल्यामुळे संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती; मात्र त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्यात आलेले नाही.
शिंदे यांनी पुढे सांगितले की, संबंधित कंपन्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात लवाद (Arbitration) याचिका दाखल केली असून, त्यावरील न्यायप्रक्रिया सध्या सुरू आहे.

तसेच वृक्षगणनेच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने, सर्व अटी व शर्तींचे पालन करून, तांत्रिक छाननी समिती, महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीच्या मंजुरीनंतर पूर्ण करण्यात आली असून, कंत्राट नियमानुसार मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार अमित गोरखे यांनी सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेच्या निकषांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांच्या पैशांचा पारदर्शक आणि प्रभावी वापर व्हावा यासाठी अशा विषयांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सभागृहात नमूद केले.




















Join Our Whatsapp Group