पिंपरी (Pclive7.com):- सायबर गुन्हेगारांकडून झिप (ZIP) आणि एपीके (APK) फाईलद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून नागरिकांनी अशा संशयास्पद फाईल्स उघडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने केले आहे.

सायबर गुन्हेगार विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक किंवा ओळखीच्या व्यक्तींचे सोशल मीडिया अथवा व्हॉट्सॲप खाते हॅक करून त्यांच्या संपर्क यादीतील लोकांना ZIP किंवा APK फाईल पाठवतात. या फाईल्समध्ये ‘अकाउंट स्टेटमेंट’, ‘बिल’, ‘दस्तावेज’ किंवा इतर महत्त्वाच्या माहितीचे आमिष दाखवले जाते. अशा फाईल्स मोबाईल किंवा संगणकावर उघडल्यानंतर त्यामध्ये असलेले मालवेअर किंवा व्हायरस डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल होतात. त्यानंतर संबंधित डिव्हाईसवरील संवेदनशील माहिती, बँकिंग तपशील, पासवर्ड यांची चोरी करून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी..
अनोळखी व्यक्तीकडून आलेली ZIP किंवा APK फाईल उघडण्यापूर्वी पाठवणाऱ्याची खात्री करा.
आर्थिक व्यवहारासंदर्भातील संदेश आल्यास संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधा.
सोशल मीडियावरून प्राप्त झालेल्या संशयास्पद फाईल्स डाउनलोड करू नका.
अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.
व्हॉट्सॲप आणि इतर खात्यांवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करा.
मोबाईल व संगणकावर अद्ययावत अँटीव्हायरस वापरा.
पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद फाईल्स किंवा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल cybercrime.gov.in किंवा हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group