वाकड (Pclive7.com):- जर्मनी येथे पार पडलेल्या ज्युनिअर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देत जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी मुळशी तालुक्यातील माण गावची कन्या व विश्वविजेती नेमबाज कु. शौर्या दिलीप भरणे हिचा नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे व रणजित कलाटे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम दरबाराचे पवित्र स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शौर्या भरणे हिच्या कुटुंबीयांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली.

यावेळी बोलताना नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी सांगितले की, “शौर्याने आपल्या जिद्द, शिस्त, अथक परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रासह मुळशी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिची ही कामगिरी राज्यातील आणि देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”

महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीपभाऊ भरणे यांच्या कन्या असलेल्या शौर्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून क्रीडासंस्कार, सातत्यपूर्ण मेहनत आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळामुळे कोणतेही ध्येय गाठता येते, हे सिद्ध करून दाखवले आहे. दिलीपभाऊ भरणे यांनी आपल्या कन्येतील प्रतिभेला योग्य दिशा व प्रोत्साहन दिल्यामुळे आज तिच्या रूपाने भारताला जागतिक स्तरावर अभिमानास्पद यश मिळाले आहे.
यावेळी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी कु. शौर्या दिलीप भरणे हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही सुवर्णपदक पटकावून भारत, महाराष्ट्र आणि मुळशी तालुक्याचा गौरव अधिक उंचावावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.




















Join Our Whatsapp Group