पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीकडून पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाली आहे. असा बहुमान मिळविणारी ही शहरातील पहिलीच एकमेव शाळा ठरली आहे. पाच वर्षांसाठी शाळेला एक कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ ठरणार आहे.
पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील १५ शाळांची निवड करण्यात आली. येत्या काळात या शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकास केला जाणार आहे. या शाळांत ‘आयसीटी लॅब’, ‘डिजिटल लायब्ररी’, ‘स्मार्ट क्लासरूम्स’, ‘स्टेम लॅब’, ‘टिंकरिंग लॅब’ तयार करण्यात येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे.
प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार..
या शाळांमध्ये अधिकाधिक प्रायोगिक, परिवर्तनात्मक सर्वांगीण विकास आणि एकात्मिक पद्धती (ज्यात सर्व प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर अॅक्टिव्हिटी असतील) शिकविण्यासाठी आणि शिकण्यासाठी असणार आहेत. या शाळांमध्ये ‘डिस्कव्हरी ओरिएंटेड’ आणि ‘लर्निंग सेंट्रिक टीचिंग मेथड’ राबविण्यात येणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची आणि शोधण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होईल, अशा पद्धतीने ते शिकवले जाईल. खेळ आणि खेळण्यांवर आधारित अध्यापन केले जाईल. त्यात, लोकप्रिय खेळांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
पीएमश्री शाळेची वैशिष्ट्ये…
* ‘पीएमश्री’ च्या शाळा या आदर्श विद्यालये म्हणजेच मॉडेल स्कूल असतील. * राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी पूर्णपणे (एनईपी) सुसंगत असतील. * शाळांचे पूर्णपणे आधुनिकीकरण होणार पायाभूत सुविधांनुसार इमारतींचीही सुधारणा. * स्मार्ट क्लासरूम, संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर एनईपीअंतर्गत ‘प्ले स्कूल’चाही समावेश. * इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचे वर्ग शिकवले जाणार. * या शाळांसाठी एकूण ६० मानके निश्चित. * विविधांगी प्रयोगांची रेलचेल, खेळही.