मालमत्ता धारकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कर संकलन विभागाचा निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांची कर संकलन कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी उद्या गुरुवार (दि.30) आणि शुक्रवारी (दि.31) कर संकलन कार्यालयातील कॅश काऊंटर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सिध्दी उपक्रमा अंतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ता धारकांना बिलांचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. त्यामुळेच कर संकलन विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षातील पावणेदोन महिन्यातच अडीचशे कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे.
कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांना विविध कर सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरण्यास अनेक मालमत्ताधारक प्राधान्य देत आहेत. महापालिकेच्या वतीने कर संकलनासाठी 17 झोन आहेत. तसेच ऑनलाईनही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेक नागरिक रोखीने कर भरत आहेत. त्यामुळे कर संकलन कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याचाच विचार करून महापालिकेच्या वतीने उद्या गुरुवार (दि.30) आणि शुक्रवारी (दि.31) कॅश काऊंटर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.