सांगवी (Pclive7.com):- सांगवी परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा बुधवारी (दि.२९) गोळ्या झाडून खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. हा खून १५ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याचे समोर आले आहे.
दीपक कदम (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलीसांनी अमन गिल याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील बजरंग शिस्तारे (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. तर, आरोपी अमन गील याच्यावरही एक गुन्हा दाखल आहे. दीपक आणि अमन हे मित्र होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. याचा राग अमनच्या मनात होता.
बुधवारी रात्री नवी सांगवी मधील माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर आरोपींनी दीपक याच्यावर गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहर्यावर दोन गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.