पिंपरी (Pclive7.com):- महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन चालकांसाठी सशुल्क वाहन पार्किंग (पे ॲण्ड पार्क) योजना मोठा गाजावाजा करत सुरू केली होती. मात्र वाहन चालकांसह वाहतूक पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने ही योजना अखेर, महापालिकेने गुंडाळली आहे. त्यामुळे शहरात वाहन पार्क करण्यासाठी कोणी पैसे देऊ नये असे निवेदन महापालिकेचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.
शहरात तसेच, शहरालगत असलेल्या नागरी भागातील वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे तसेच, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहने उभी केली जात होती. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येस तोंड द्यावे लागत होते. शहरातील नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत होणे व पार्किंगची सुविधा उपलब्ध होणे या हेतूने वाहतूक पोलिस आणि महापालिकेने पे ॲण्ड पार्क योजना शहरातील विविध भागांत सुरू केली होती. त्याचे उद्घाटन तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी केले होते.
रस्त्यांवर वाहन पार्क केलेल्यांकडून शुल्क वसूल करण्यासाठी महापालिकेने ७ एप्रिल २०२१ ला निर्मला ऑटोकेअर या एजन्सीची नेमणूक केली होती. वाहन चालकांनी तसेच, वाहतूक पोलिसांनी या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काही महिन्यांतच ही योजना अनेक ठिकाणी बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली. रडतखडत काही भागात ही योजना सुरू होती. अखेर, ६ एप्रिल २०२४ ला ठेकेदाराची मुदत संपुष्टात आल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात कोठेही वाहनांसाठी रक्कम वसूल करता येणार नाही, असे सहशहर अभियंता ओंभासे यांनी सांगितले.