तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सहा जणांच्या टोळक्याने गुरुवारी (दि.२०) चार ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने नाशिक येथून अटक केली आहे.
रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय १८, रा. कातवी रोड, तळेगाव स्टेशन), नीरज उर्फ दाद्या बाबू पवार (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी), आदित्य नितीन भोईनल्लू (वय २१, रा. कामाठीपुरा, ता. शिरूर), ओमकार उर्फ बंटी दत्ता आसवले (वय २०, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ), समर्थ संभाजी तोरणे (वय १९, रा. कात्रज, पुणे), अमन मेहबूब शेख (वय १९, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून ‘आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागायचे नाही’ असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत तळेगाव दाभाडे शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक या ठिकाणी गोळीबार केला. आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हा गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते.
या गुन्ह्याचा समांतर तपास करत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने मुख्य आरोपी रोहन शिंदे, नीरज पवार, आदित्य भोईनल्लू यांना नाशिक मधून ताब्यात घेतले. आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या तीन आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
या आरोपींकडे तपास करत असताना गुंडा विरोधी पथकाला तळेगाव शहरात आणखी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप आणि पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांची दोन पथके तयार करून तळेगाव दाभाडे परिसरात रवाना केली. अशोक जगताप यांच्या पथकाने निलया नाईकनवरे सोसायटी तळेगाव दाभाडे येथून ओमकार असवले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांच्या पथकाने तपोधाम कॉलनी गार्डन वराळे रोड तळेगाव दाभाडे येथून समर्थ तोरणे आणि अमन शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींना देखील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, श्याम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, तौसीफ शेख, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.