पिंपरी (Pclive7.com):- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीमधून अधिक नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अटक केली आहे. त्यांचा कर्जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहभाग आढळल्याने दोघांनाही कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सतीश सुरेश बुंदेले (रा. लिंक रोड, चिंचवड), परेश गुलाब बिरदवडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे पोलिस अंमलदार सुरज शिंदे यांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना बँकेत घेऊन येतो आणि त्यांचे खाते सुरू करून घेतो. त्याकारणाने संशय आल्याने पोलिसांनी संबंधित बँक खातेधारकाची माहिती काढली. खातेधारक सतीश बुंदेले याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, की त्याचा मित्र परेश बिरदवडे याने बँकेत खाते सुरू करण्यास सांगितले होते. खाते सुरू करण्यासाठी परेशकडून सतीशने ऑनलाईनच्या माध्यमातून पैसेदेखील घेतले होते. पोलिसांनी परेश याला ताब्यात घेतले.

दोघांच्या चौकशीअंती लक्षात आले की, दोघांनी कर्जत येथील एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून त्या व्यक्तीची ११ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोघांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केला. आरोपींनी वेगवेगळे बँक खाते सायबर फसवणूक करण्यासाठी वापरले असून आरोपींनी काढलेल्या खात्यांबाबत भारतातून ४० तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे.






















Join Our Whatsapp Group