पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरण आणि परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील वीज पुरवठा तातडीने नियमित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी दिला आहे.
सुलक्षणा शिलवंत धर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण प्राधिकरण भागामध्ये वीज पुरवठ्यातील अनियमितता आणि अकार्यक्षमता वाढली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आम्ही, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महावितरण कार्यालय प्राधिकरणाकडे आपल्या वीज पुरवठ्यातील समस्यांचा तात्काळ निवारणासाठी लेखी निवेदन सादर केले आहे.
लेखी निवेदनात आम्ही महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना वीज पुरवठ्यातील समस्यांचे त्वरित समाधान करण्याची विनंती केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीच्या आत कार्यवाही न केल्यास, त्यांच्या कार्यालयास टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महावितरणचे अधिकारी श्री सरोदे आणि श्री वाघमारे यांना देण्यात आला आहे.
यावेळी ईखलास भाई सय्यद, दिलीप पानसरे, वैदेही पटवर्धन, राजेंद्र कदम, वर्षा जाधव, गणेश काळे, पंचशीला कांबळे उपस्थित होते.