पिंपळे सौदागर (Pclive7.com):- १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यंदा १५ ऑगस्टला देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. परंतु यावेळचा स्वातंत्र्य दिन हे पिंपळे सौदागर वासियांसाठी एक वेगळेपण देणारा ठरणारा आहे.
कारण शहरात शत्रुघ्न काटे आणि नवीन व भन्नाट उपक्रम असे एक समीकरण तयार झाले आहे. यामुळेच प्रभागात एक नवीन आगळावेगळा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर याठिकाणी जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यामध्ये एक हस्तनिर्मित तिरंगा बनवण्याच्या प्रयत्न करणार आहोत. म्हणजे यामध्ये परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक तसेच इतर लोकांनी त्यांच्या हाताच्या पंज्याला हिरवा तसेच भगवा रंग लावून पांढऱ्या कापडावर छाप मारून तिरंगा बनविला जाणार आहे.
तसेच या ठिकाणी उपस्थित आजच्या पिढीला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य स्वीकारले अश्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती देऊन स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच देशभक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपळे सौदागरचे नाव जागतिक पातळीवर कोरण्यासाठी करत असलेल्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी आपण सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.