पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना आणि राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत उद्या बुधवार दि.१४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजता आकुर्डी परिसरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीही केंद्र शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास स्वाक्षरी मोहीम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पादचाऱ्यांसाठी व सायकलप्रेमी लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक परिसर उत्साहवर्धक बनवण्याच्या उद्देशाने महापालिकेने हरित सेतू प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामुळे या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने देखील या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीचे प्रस्थान १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर सभागृह येथून होणार आहे. ही रॅली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोरून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाईल. तेथून अप्पूघर चौक – हुतात्मा चौक – छत्रपती संभाजी महाराज चौक – लाल बहादूर शास्त्री चौक – गांधी हॉस्पिटल – फ क्षेत्रीय कार्यालय – लोकमान्य हॉस्पिटल – म्हाळसाकांत चौक – नॅशनल सुपर मार्केट – संजय काळे ग्रेड सेपरेटर – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय या मार्गाने मार्गस्थ होऊन पुन्हा आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर सभागृह या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.