पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनल यादव यांनी दिला आहे.

मीनल यादव यांनी यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोहननगर परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून दररोज ३ ते ४ तास वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली आहे. महावितरणचे कर्मचारी येऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गृहिणी, शाळकरी मुले तसेच कामाला जाणाऱ्या नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सकाळचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे.

तरी मोहननगर परिसरात वारंवार खंडित वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी स्वतः लक्ष घालून कायम स्वरूपी तोडगा काढावा. वीज पुरवठा कसा सुरळीत होईल, यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन यापूर्वीही देण्यात आलेले आहे. आता तातडीने मोहननगर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू किंवा महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेविका मीनल यादव यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group