पुणे (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती, अशी जाहीर कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात संघर्ष होवून फूट पडली. पुन्हा एकदा महाराष्ट्राने काका पुतण्याची राजकीय भांडणं बघितली. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे दोन गट निर्माण झाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील हा संघर्ष सर्वात जास्त चर्चेचा विषय बनून राहिला. बारामती लोकसभा मतदार संघ हे या संघर्षाचं केंद्र होतं.

बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा नणंद भावजय लढत झाली. यात सुप्रिया पवार यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला. तर सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत शरद पवार यांनीच आपण बारामतीकरांच्या मनावर राज्य करत असल्याचं सिद्ध केलं.

या लढतीबद्दल बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती अशी जाहीर कबुलीच त्यांनी दिली आहे.

अजित पवार म्हणाले, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं. राजकारणाला घरात शिरू द्यायचं नसतं. लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लमेंटरी बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नसतो.






















Join Our Whatsapp Group