पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील भुमकर चौक परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका आलिशान कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. भररस्त्यात कारमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून अचानक धूर निघत असल्याचे दिसून आले. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. मात्र, काही क्षणांतच आगीच्या ज्वाला भडकल्या आणि संपूर्ण वाहनाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले.

माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार वाहनातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group