पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून निकिता दनाने ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश झांबरे आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, निकिता शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर तिची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने दिनेश आणि निकिता यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या दिनेशने हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये जाऊन निकिता आणि सागर यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. आरोपीने दोघांवर सपासप वार केल्याने सागर गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर निकिता गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी दिनेश झांबरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत प्रेमसंबंधातील वाद आणि मत्सरातून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group