पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णवाहिका सेवांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी आणि रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौर रवि लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक खासगी रुग्णवाहिका चालक आणि सेवा पुरवठादारांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेत अवाजवी दर आकारले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांच्या भाडेदराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्यामुळे तसेच दरांमध्ये एकसमानता नसल्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गंभीर आजार, अपघात किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी रुग्णसेवा ही मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब असताना तिचे व्यापारीकरण होणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुढील उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
खासगी रुग्णवाहिकांसाठी किलोमीटरनिहाय व सेवेनिहाय अधिकृत दर निश्चित करावेत.
सर्व रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करावे.
मनमानी दर आकारणाऱ्या चालक व संस्थांवर दंडात्मक कारवाई करावी.
नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन किंवा ऑनलाइन तक्रार निवारण व्यवस्था सुरू करावी.
महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णवाहिकांची नोंदणी व नियमित तपासणी करण्यात यावी.
सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group