पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माजी नगरसेवक राजू दुर्गे यांची शहराच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते दुर्गे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, “राजू दुर्गे हे अभ्यासू, प्रभावी वक्ते आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणारे कार्यकर्ते आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची प्रभावी मांडणी करणे तसेच विरोधकांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला तथ्याधारित उत्तर देणे, ही जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेसमोर मांडली जाईल.”

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजू दुर्गे म्हणाले, “भाजप नेतृत्वाने आणि शहराध्यक्ष बापू काटे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे, विकासाभिमुख विचारसरणी आणि शहरातील विकासकामे विविध प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.”

राजू दुर्गे यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या जनसंपर्क आणि माध्यम समन्वयाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.



















Join Our Whatsapp Group