पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने त्यांच्या फॉर्च्युनर कारने प्रवास करत होते. मिसिंग लिंक बोगद्यात त्यांच्या कारने समोरून जात असलेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आणि तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात कारमधील आणखी तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या अपघातामुळे मिसिंग लिंक बोगद्यात काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.



















Join Our Whatsapp Group