पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अभियंता या पदावर पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करणे, तसेच लेखा विभागाकडील पेन्शन विषयक कामकाज करण्यासाठी सेवानिवृत्त लेखाधिकारी राजू जठार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करणे, यासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या मुख्य अभियंता -२ या पदावरून मुख्य अभियंता रामदास तांबे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. या रिक्त जागेवर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय नुसार सह शहर अभियंता (स्थापत्य) या पदावरील शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि दायित्वाची माहिती, संगणक अर्हता इ. सेवाविषयक तपशील पडताळून सह शहर अभियंता संजय नारायण कुलकर्णी यांना शासन मान्यतेच्या अधिन तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली होती. त्यानुषंगाने आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी हा विषय विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता, त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
तसेच महापालिकेच्या अस्थापानेवरून सेवानिवृत्त होणा-या तसेच मयत कर्मचा-यांचे सेवा निवृत्तीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लेखा विभागाकडील मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता ६ महिने कालावधीसाठी एकत्रित मानधनावर सेवा निवृत्त लेखाधिकारी राजू जठार यांची नियुक्ती करण्याबाबतच्या विषयाला देखील प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.
विशेष बैठकीतील मंजूर विषय
पिंपरी येथील अशोक थियटर परिसरातील रस्त्यांचे तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, महापालिकेच्या अग्निशमन विभागातील गट ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचक तथा फायरमन रेस्क्यूअर या पदांच्या परिक्षेसाठी येणा-या खर्चाची रक्कम संबंधित कंपनीस अदा करणे, रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी तसेच स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी सल्लागार नियुक्त करणे, यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान अदा करणे अशा विविध विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.