पिंपरी (Pclive7.com):- ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत शहरातील विविध भागांतून नागरिकांनी रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे आणि इतर सार्वजनिक सुविधांबाबत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध उपाययोजना, उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून महापालिकेस नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका हद्दीतील संबंधित परिसरांमध्ये विकासकामे करण्यासाठी मदत होणार आहे. “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या मोबाईल ऍपच्या माध्यमातून नागरिक त्यांच्या अपेक्षा, सूचना, कल्पना ऑनलाईन पद्धतीने नोंदवित आहेत.
या अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागरण मोहिम राबविण्यात येत असून वृत्तपत्रे, रेडिओ, व्हीएमडी बोर्डस याखेरीज सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून नागरिकांना अंदाजपत्रकातील सहभागाचे महत्व समजावून सांगितले जात आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत खास चित्ररथ (एलइडी व्ह्यॅन) च्या सहाय्याने शहरातील विविध भागातील नागरिकांना सहभागी होण्याबाबत आवाहन केले जात आहे. अनेक नागरिकांना या चित्ररथामुळे यामागील कल्पना आणि उद्दिष्ट्ये समजावून सांगण्यास मदत होत आहे. तसेच चित्ररथावरील क्युआर कोडच्या माध्यमातून अनेकांनी आतापर्यंत या मोहिमेत सहभागी होऊन त्यांच्या परिसरातील पायाभूत सुविधांबाबतच्या मागण्या, अभिप्राय नोंदविल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नागरिकांनीही त्यांच्या परिसरातील पायाभूत सोयीसुविधांबाबत मागण्या आणि सूचना देणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाची सूचना महत्त्वाची असून नागरी परिसराचा विकास साधण्यासाठी महापालिकेस यामुळे मदत होणार आहे. तसेच चालू वर्षात नागरिकांनी नोंदविलेल्या अडचणी, समस्या किंवा मागण्यांचा विचार नवीन वर्षाच्या अंदाजपत्रकात (२०२५-२६) करण्यात येणार आहे. तरी स्मार्ट सारथी ऍपच्या माध्यमातून नागरिकांनी स्वत:ची प्राथमिक माहिती भरून अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग २०२५-२६’ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
शहरातील नागरिक महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, स्मार्ट सारथी ऍप तसेच https://fxurl.co/9kiz9 या वेबलिंकद्वारे किंवा बारकोडद्वारे प्राथमिक माहिती भरून ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकतात.