महापालिका प्रशासनाला निवेदन; तातडीने कारवाई करण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या खेळाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन वर्ष लैंगिक छळ केला. धक्कादायक म्हणजे हे माहीत असूनही संबंधित शाळेने या नराधमाला शाळेत रुजू करून घेतले. अशा बेजबाबदार शिक्षण संस्थेस महापालिकेने भाडेतत्वावर शाळेसाठी इमारत दिली आहे. तातडीने हा भाडेकरार रद्द करावा, संस्थेवर त्वरित प्रशासक नेमून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

निगडी येथील एका शाळेत गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त विजय थोरात आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी ‘त्या’ विद्यालयत सबंधित मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचाराबाबत संस्थेवर कारवाई करावी म्हणून पत्र दिले. यावेळी शहर संघटक अनिता तुतारे, रजनी वाघ, कमल गो, यामिनी जाधव, वैभवी घोडके महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच संदीप भालके उपस्थित होते.

निगडी मधील एका शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. आरोपी पिडीत मुलीस वारंवार लैंगीक त्रास देत असे. पिडीत मुलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात व येत असताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे करीत असे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर मारण्याची धमकी सुद्धा देत असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार समोर आल्या नंतर आक्रमक भूमिका घेत सुलभा उबाळे यांनी उपायुक्त विजय थोरात आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची भेट घेतली. संबंधित शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता, तरीही या विद्यालयाने त्या शिक्षकास परत कामावर रुजू करून घेतले होते. हे अयोग्य आहे. अशा बेजबाबदार शिक्षण संस्थेस महापालिकेने भाड्यावर दिलेली इमारत परत घ्यावी. भाडेकरार रद्द करावा. या संस्थेवर त्वरित प्रशासक नेमून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group