पिंपरी (Pclive7.com):- बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा पतीने जाब विचारला. या कारणावरून एका टोळक्याने पतीला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही घटना १९ आणि २० ऑगस्ट रोजी महाळुंगे येथील साई अमृत लॉज येथे घडली. याप्रकरणी तक्रारदाराने आत्ता फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

या प्रकरणी दीपक मधुकर जाधव (वय 25 दिघी), दीपक सुभाष सोनवणे (वय 26, रा. महाळुंगे), तेजस सोपान गाढवे (वय 26), सचिन बालाजी चांदुरे (वय 33), अक्षय मारुती पाटील (वय 27, रा. चिखली) अशी अटक पाच आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींसह त्यांचे साथीदार बंटी व गोल्या या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संकेत रामचंद्र गावडे असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती संकेत हे मुलांसह बाहेर जेवण्याकरिता जयदीप हॉटेल येथे गेले होते. यावेळी फिर्यादी यांचे पती बिल भरत असताना फिर्यादी या त्यांच्या मुलासह हॉटेलच्या बाहेर थांबल्या होत्या यावेळी दीपक सोनवणे व त्याचा मित्र हे दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या अंगावर एक चिठ्ठी फेकली. याचा जाब फिर्यादी यांच्या पतीने विचारला असता आरोपींनी त्यांना तिथे मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी फोन करून साई लॉज येथे भेटण्यास बोलावले. त्यानंतर फिर्यादीचे पती साई लॉज येथे गेले असता आरोपींनी संगणमत करून त्यांना दांडक्याने व लाथा बुक्क्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. फिर्यादी या तेथे पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या संकेत यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group