पिंपरी (Pclive7.com):- तोतया पोलिसांनी दोन तरुणांचे अपहरण करुन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जांब येथे घडली. योगेश विश्वास सावंत (वय ३४, रा. राऊतनगर, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय २६, रा. मगरवस्ती खंडाळी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शुभम यशवंत कुलकर्णी (वय २१, रा. गायकवाडनगर, पुनावळे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अभ्युदय चौधरी हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी एक लाख ९० हजारांचा ऐवज मारहाण करून काढून घेतला. फिर्यादी यांना ३० ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे सोडून दिले. या घटनेचा समांतर तपास खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथककडून सुरू होता.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी..
पोलिसांनी घटना स्थळ आणि टोलनाक्यावरील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील असल्याबाबत खात्री झाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक माळशिरस येथे रवाना केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून ताब्यात घेतले. आरोर्षीकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दोन मोबाइल फोन असा एकूण ८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ज्ञानेश्वर घाडगे यांच्यावर वेळापूर पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच निष्पन्न आरोपींवरही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत ॲट्रोसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ज्ञानराजा सोसायटी फसवणुकीचे कनेक्शन..
खंडणी विरोधी पथकाने ३१ ऑगस्ट रोजी ३ हजार ५१५ कोटींच्या बीड येधील ज्ञानराजा सोसायटी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी यशवंत कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी या दोघांना अटक केली आहे. शुभम कुलकर्णी हा यशवंत कुलकर्णी यांचा मुलगा असून तो शिक्षणाकरिता पुनावळे येथे राहण्यास आहे. त्याचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. मात्र आरोपींनी यशवंत कुलकर्णी यांचा मुलगा असल्याने त्याचे अपहरण केले होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेव कोषनर, यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, प्रदीप गोडोंचे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, आशिष बोटके, प्रदीप गायकवाड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस अंमलदार हलगे यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group