पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे तुतारी फुंकणार असल्याचे त्यांचे पुत्र विक्रांत लांडे यांनी अखेर जाहीर केले आहे. आज शरद पवार यांच्या भेटीनंतर विक्रांत लांडेंनी त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार पुन्हा एक धक्का देणार आहेत.
अजित पवार यांचे समर्थक अजित गव्हाणे यांनी भोसरीतील अनेक माजी नगरसेवकांसह नुकताच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे यांचा प्रवेश मात्र झाला नव्हता. त्यामुळे विलास लांडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान काल (दि.३०) विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, मात्र या भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया लांडे यांच्याकडून आलेली नव्हती.
आज (दि.०१) अजित गव्हाणे यांच्यासह विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत लांडे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. त्याबाबत माहिती देताना विक्रांत लांडे म्हणाले की, आज आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला. विलास लांडे यांचा लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होईल. शरद पवार यांनी तारीख दिली की विलास लांडे तुतारी फुंकणार असल्याचे विक्रांत लांडे यांनी ठामपणे सांगितले आहे.
कालच्या प्रमाणेच विलास लांडे यांनी यापूर्वीही अनेकदा शरद पवारांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र त्यांनी स्वतःहून घरवापसीच्या प्रवेशावर कधीचं भाष्य केलेले नाही. नेहमी त्यांनी संभ्रमाचं राजकारण खेळलेलं आहे. त्यामुळे जो पर्यंत विलास लांडे हातात तुतारी घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित कसा मानायचा? अशी चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरात रंगलेली आहे.