पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे नागरिक शहरामध्ये वास्तव्यासाठी प्राधान्य देत आहेत. शहरामध्ये सुरू असलेले औद्योगिकीकरण व वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील नागरिकांना मूलभूत पायाभूत सोयी-सुविधा देण्यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कायम पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सदैव विविध विकास योजनांची अंमलबजावणी केली आहे. शहरातील प्रभाग २५ पुनावळे येथील वाढते उद्योग, नागरीकरणामुळे लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला दळणवळणासाठी सोयीस्कर रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची बांधणी व दुरुस्ती करण्याची विकास योजना महापालिकेने मंजूर केली आहे. यामुळे प्रभाग २५ मधील नागरिकांना मोठे दुहेरी मार्ग असणारे रस्ते उपलब्ध होणार आहेत, अशी मंजुरी महापालिकेच्या स्थायी समितीकडून देण्यात आली आहे.
‘हे’ रस्ते होणार सुसज्ज आणि रुंद!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग २५ पुनावळे, ताथवडे, वाकड या भागामध्ये येणाऱ्या रस्त्यांच्या विकास योजनांना महापालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुंबई-बंगळुरू हायवेपासून काटेवस्तीकडे जाणारा ३०.०० मी. रुंदीचा व 2000 मीटर लांबीचा डी.पी रस्ता, कोयतेवस्ती चौक ते जांभेगावाकडे जाणारा १८.०० मी. रुंदीचा व 1300 मीटर लांबीचा डी.पी रस्ता, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड २४.०० मी. रुंदीचा व 2520 मीटर लांबीचा डी.पी रस्ता, सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड १८.०० मी डी.पी रस्ता त्यासोबतच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोडपर्यंत जोडणारा वाकड शिवेपर्यंत १८.०० मी रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच, ताथवडे गावातून जीवननगरतर्फे एमटीयू कंपनीकडे जाणारा १८.०० मी रुंदीचा व 800 मीटर लांबीचा डी.पी रस्ता, बी.आर.टी रस्त्यापासून पुनावळे गावठाणातून जाणारा १८.०० मी रुंदीचा व 1190 मीटर लांबीचा डी.पी रस्ता, वाकड येथील टीपटॉप हॉटेलपासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८.०० मीटर रुंदीचा व 800 मीटर लांबीचा डी.पी रस्ता व गायकवाडनगरमधील १८.०० मी रुंदीचा व
760 मीटर लांबीचा डी.पी रस्त्यांची उर्वरित स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत.
रस्त्यांच्या कामामुळे पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील वाहतूककोंडी होणार कमी!
प्रभाग २५ पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील रस्त्यांच्या विकास योजनेमुळे प्रभागातील वाहतूककोंडी कमी होणार असून रहिवाशांची सोय होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. जसे की, वाकड भागातील भूमकर चौक व भुजबळ चौकामधील रस्त्याच्या बांधणीनंतर सध्या होणाऱ्या वाहतूककोंडीस शहरवासीयांना सामोरे जावे लागणार नाही. सदर विविध रस्त्यांच्या विकास योजनांमुळे सुनियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण होणार आहे. नागरिकांना आरामदायी प्रवास, दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते, सुरक्षित पदपथे (पेडेस्ट्रीयन फ्रेंडली फुटपाथ) उपलब्ध होणार आहेत. सदर रस्त्यांच्या विकास योजनांमुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.
चऱ्होली, डूडूळगाव, दिघी याभागातील विकासासाठी येत्या ३ महिन्यांमध्ये ‘कॅपीटल इंन्वेस्टमेंट प्लॅन’
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा चऱ्होली, डूडूळगाव व दिघी सारख्या नव्याने विकसित होणाऱ्या भागांच्या विकासासाठी महापालिका येत्या ३ महिन्यांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी ‘कॅपीटल इंन्वेस्टमेंट प्लॅन’ जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे चऱ्होली, डूडूळगाव, दिघी सारख्या भागांच्या विकासाला चालना मिळून शहरातील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणार आहे. असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील रस्त्यांच्या विकासकामांमुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून मुक्तता होईल !पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वास्तव्य व विविध क्षेत्रातील कामाच्या संधीमुळे नागरिक शहरास प्राधान्य देत आहेत. यामुळे पुनावळेसारख्या वाढत्या नागरीकरण असलेल्या भागामध्ये सुसज्ज रस्ते असणे गरजेचे असून त्यामुळे येथील होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरिकांची मुक्तता होणार आहे. प्रभाग २५ पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासकामांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. शहरामधील दळणवळणाची स्थिती सुधारणे महापालिकेचे ध्येय असून त्यावर महापालिकेकडून पावले उचलण्यात आली आहेत.– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका