आर्थिक विकास महामंडळ निर्मितीची घोषणा; २० वर्षांपासून प्रलंबित मागणीला मिळाला न्याय
भोसरी (Pclive7.com):- सुवर्णकार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सोनार समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी, बेरोजगारांना व्यवसायासाठी प्रोत्साहन, तसेच शिक्षणासाठी मदत होणार आहे. राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी पाठपुरावा केला, अशी माहिती अखिल भारतीय सोनार समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास भांबुर्डेकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत दि.३० सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळातर्गंत हे महामंडळ असेल.
कैलास भांबुर्डेकर सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ बनवावे. यासाठी आम्ही गेल्या २० वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी याबाबत राज्य सरकारकडे विषय लावून धरला. त्याला यश मिळाले. सुवर्णकार समाजाकडे सधन आणि व्यावसायिक म्हणून पाहिले जाते. मात्र, सुवर्णकार समाजातील ७० ते ८० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. राज्यात २० ते २५ लाख इतकी समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे समाजातील युवकांसाठी उद्योजकता, नोकरी व व्यावसाय यामध्ये प्रोत्साहन मिळावे. या करिता सुवर्णकार आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी होती. मात्र, गेल्या २० वर्षांपासून ही मागणी राज्य सरकारकडे प्रलंबित होती. अनेकदा आम्हाला आश्वासन देण्यात आले. मात्र, निर्णय झाला नव्हता. मात्र, विद्यमान सरकारने समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
समाजातर्फे आमदार महेश लांडगे यांचे आभार…
भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून सुवर्णकार समाजासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या करिता आम्ही अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून या मागणीला बळ मिळाले. या महामंडळाचे (उपकंपनी) मुख्यालय मुंबई येथे राहील. तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या उपकंपनीमार्फत राबवण्यात येतील. या उपकंपनीस पन्नास कोटींचे भागभांडवल देण्यात येईल. तसेच सोळा पदे भरण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे, असेही अखिल भारतीय सोनार समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास भांबुर्डेकर यांनी म्हटले आहे.