पिंपरी (Pclive7.com):- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अदरांजली अर्पण करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. याअंतर्गत भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामुहिक कृतीला बळकटी देण्यासाठी दरवर्षी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा आयोजित केला जातो. महापालिकेच्या वतीनेही १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप आज पिंपरी चिंचवड शहरात झाला.
त्यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबून स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. तसेच यावेळी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपळेगुरव येथील लिनिअर गार्डन येथे उभारण्यात आलेल्या आर.आर.आर केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, राजेश आगळे, श्रीकांत कोळप, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले, श्रीराम गायकवाड, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण, रेश्मी तुंडूळवार, बेसिक्स झोनर इन्चार्ज सुखदेव लोखंडे तसेच आरोग्य कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
आर.आर.आर केंद्राअंतर्गत नागरिकांनी ज्या निरूपयोगी वस्तू जमा केल्या आहेत त्या वस्तू गरजूंना देण्यात येतील. वस्तूंना रिसायकल, रियुज, रिड्युस करण्यासाठी म्हणजेच आपल्याकडील वस्तूंच्या पुन:वापरासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दर्शवून आपल्याकडील जुने कपडे, खेळणी, भांडी, बूट, चप्पल, पर्स, बॅग्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके इ. निरूपयोगी वस्तू आरआरआर केंद्रावर जमा करण्याचे आवाहन यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले.