मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही मित्रपक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो. आमचे मतदारसंघही ठरले होते. आम्ही समाजाशी चर्चा केली. मित्र पक्षांनी यादी दिलेली नाही. मी तर कुणाला पाडही म्हणत नाही आणि निवडून आण हे पण हे सांगणार नाही. आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार. मराठा समाज जर का एकटा लढला, तर निवडून येणार नाही. माझा समाज खूप वेदनेतून गेला आहे. मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा निवडून आणायचं त्यांना आणा. मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या. व्हिडीओही काढून घ्या. ” असंही आवाहन मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
एका जातीवर जिंकता येत नाही
एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असंही जरांगे यांनी सांगितलं.
माझ्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही-जरांगे
महायुती आणि महाविकास आघाडी कुणाचाही दबाव नाही. कुणीही दबाव टाकला तर मी त्याच्या घरी जाऊन डोक्यात दगड घालेन असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही. मी बदलत नाही, बदलणार नाही. आम्ही तीन ते चार महिने अभ्यास केला होता. महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे. मी मनोज जरांगे एकटा नाही. तर मी म्हणजे आमचा पूर्ण समाज आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.