चिंचवड (Pclive7.com):- यंदा काहीही झालं तरी चालेल, तुतारी वाजवणार, परिवर्तन घडवणार आणि राहुल दादांना आमदार करणारच.. असा निर्धार पुनावळेकरांनी व्यक्त केला. हलगी, तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात आणी ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी जागोजागी स्वागत करून, महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या परिवर्तन पदयात्रेस तुफान प्रतिसाद दिला.
राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी पुनावळे गावठाण, वाड्या वस्त्यांवर सोमवारी (ता. ११) सायंकाळी परिवर्तन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राहुल कलाटे यांचे पुनावळे गावात आगमन होताच ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत झाले. त्यानंतर, पुनावळेकरांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांना नारळ वाढवून स्थानिक मान्यवर ग्रामस्थ आणि हजारो नागरिकांसोबत पदयात्रेस सुरुवात झाली.
पुनावळे गावठाण, काटे वस्ती, कोयते वस्ती, पांढरे वस्ती, गायकवाड नगर मार्गे माळवाडीतील सावतामाळी महाराज मंदिर, दर्शले वस्ती पर्यंत निघालेल्या पदयात्रेत ठिकठिकाणी महिलांनी कलाटे यांना औक्षण केले. तसेच, नागरिकांनी कलाटे यांना भेटून हार, फुले देत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे पदयात्रे दरम्यान, यंदा वारं फिरलंय, परिवर्तन होणार-तुतारी वाजणार, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या घोषणांनी पुनावळे परिसर अक्षरशः निनादून गेला होता.
मोहिते चौकात पदयात्रा पोहचताच क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून, पाच जेसीबीतुन मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करत कलाटे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी, पुनावळेचे माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, सुभाष रानवडे, बाळासाहेब बोडके, मारुती दर्शले, उदयोजक रोहिदास बोरगे, संतोष पवार, भरत काटे, अतुल ढवळे, राजू दर्शले, नवनाथ ताजने, संदीप ताजने, निवृत्ती दर्शले, ज्ञानदेव काटे, संभाजी शिंदे, पोलीस पाटील दिलीप दर्शले आदि मान्यवरांसह शेकडो ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुनावळेतील कचरा डेपो प्रश्न फक्त राहुल दादांमुळेच मार्गी लागला. त्यांनी राज्य सरकारपर्यंत आमची बाजू लावून धरली. त्यामुळे आमचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आणि पुनावळेसह चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी चिंचवडला राहुल कलाटे यांच्या रूपाने नवीन नेतृत्व हवे आहे.– नितीन दर्शलेशिवसेना (उ.बा.ठा) विभाग प्रमुख, पुनावळे
महिलांच्या आरोग्यावर काम करणारे, कुटुंबाच्या विकासाचा विचार करणारे राहुल कलाटेच पुनावळेच्या विकासाला गती देऊ शकतात याबद्दल आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे यंदा पुनावळेकर पूर्ण ताकदीने दादांच्या पाठीशी राहतील.
– पुजा तिवारी, सोसायटीधारक रहिवासी