पिंपरी (Pclive7.com):- बँकांमध्ये बनावट खाती उघडून त्याची माहिती नेपाळ येथील सायबर फ्रॉड करणाऱ्यांना देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग (२६, रा. निलंगा, जि. लातूर), आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी (२६, रा. गाझियाबाद), सतीश भगवान मोरे (३५, रा. लोहगाव, पुणे, मूळ गाव तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगवी येथील एका व्यक्तीला ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयितांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांपैकी एक खाते वाघोली येथील डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाघोली येथे चौकशी केली असता, संबंधित बँक खाते हे अविनाश बाकलीकर व सतीश मोरे यांच्या सांगण्यावरून काढले असून, ते खाते हे संपूर्ण कीटसह संशयित अविनाश याच्याकडे दिल्याचे संबंधिताने सांगितले. याबाबत तांत्रिक विश्लेषण करून तीन संशयितांना लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १२ मोबाइल, एक लॅपटॉप, नऊ बँक पासबुक कीट, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, असा तीन लाख पाच हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. पोलिस याप्रकणी अधिक तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विदया पाटील, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, दिपक माने, अतुल लोखंडे, प्रितम भालेराव, अभिजीत उकिरडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, संदिप टेकाळे, निलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, मुकुंद लोटके, प्रिया वसावे, दिपाली चव्हाण सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन..
नागरिकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणेसाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा. शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशन हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.