पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ऐनवेळी मोबाइल बंदीचा निर्णय घेतल्याने मतदारांची पंचाईत झाली होती. त्यामुळे घरातून मतदारांनी मोबाइल घेऊन आल्यानंतर मोबाइल ठेवायचा कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली होती. मात्र, निवडणूक विभागाने विधानसभेलाही मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. गोपनीयतेचा भंग होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील केंद्रांच्या शंभर मीटरच्या आत मोबाइल नेण्यास बंदी घातली होती. निवडणूक विभागाने मतदानाच्या दोन-तीन दिवस अगोदर अचानक घेतलेल्या या निर्णयाने मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांबरोबर मतदारांचा वाद झाले होते.
मतदान न करताच अनेकजण निघून गेले होते..
लोकसभा निवडणुकीत काही नागरिक एकटेच मतदान केंद्रावर आले होते. त्यांना मोबाइल नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने त्यांनी पोलिसांशी काही वेळ वाद घालून सोडण्याची विनंती केली. पण पोलिस ऐकत नसल्याने मतदान करायचे नाही म्हणून ते परत माघारी निघून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घातल्याने त्याचा मतदानावर परिणाम होणार का, हे पाहावे लागणार आहे.