शास्तीकर, साडेबारा टक्के परताव्याचा अवघड प्रश्न सोडवला; शरद पवार आणि त्यांची कन्या ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी
भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकर, साडेबारा टक्के परतावा यांसारखे अवघड प्रश्न आपण सोडवले. काळजी करू नका आमदार महेश लांडगे यांनी रेड झोन आणि निळ्या पुररेषेतील बांधकामे हा प्रश्न बराच पुढे नेला आहे. येत्या काळात रेड झोन आणि निळ्या पूररेषेतील बांधकामांचा प्रश्न देखील सोडवला जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे ‘फेक नेरेटिव्ह’ शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे करत असून ‘फेक नेरेटिव्ह’ची यांच्याकडे फॅक्टरी आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.
महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली म्हेत्रे वस्ती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमित गोरखे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, समन्वयक विजय फुगे, माजी महापौर मंगला कदम, राहुल जाधव, नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, संतोष लोंढे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
“हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार” …
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गेल्या दहा वर्षात महेश लांडगे यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. या मतदारसंघात निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांचा फडणवीस यांनी चांगला समाचार घेतला ते म्हणाले शब्दशः अर्थ घेऊ नका पण एक म्हण आहे, “हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार” असाच काहीसा प्रकार भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. महाराष्ट्रातील संत महात्म्यांना देखील आरोपांना सामोरे जावे लागले आपण तर “किस झाड की पत्ती” असे म्हणत त्यांनी महेश लांडगे यांचे कौतुक केले. आपण आरोप प्रत्यारोपांना उत्तर न देता तुमचे काम सांगितले. ही खूप मोठी गोष्ट आहे असे फडणवीस म्हणाले. काम करणाऱ्या माणसाला बदनाम केले जाते पण तुम्ही चिंता करू नका भोसरीतील नागरिकांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा कोणी ‘बाल ही बाका करू शकत नाही.’ पिंपरी चिंचवडचे चित्र 2014 नंतर बदललेले सर्वांनीच पाहिले आहे. मेट्रो, फ्लायओवर, इतर इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टी 2014 नंतर वेगाने आपण तयार केल्या.
कंपन्या बाहेर गेल्या हा ‘फेक नॅरेटिव्ह’….
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप वारंवार शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जात आहे. मात्र हा आरोप धादांत खोटा असून हे दोघे ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी आहे. गेल्या काही काळात असेही सांगितले गेले की हिंजवडीतील 36 कंपन्या बाहेर गेल्या याची मी माहिती घेतली त्यानंतर असे दिसून आले महाविकास आघाडीच्या काळात 19 कंपन्यांनी आपले नवीन कॅम्पस सुरू केल .त्यांनी फक्त आपला विस्तार दुसरीकडे केला. पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर केला नाही. या ‘फेक नेरेटिव्ह’ च्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो 2014 ते 2019 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो .या काळात परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. 2020 -21 मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आज देशांतर्गत गुंतवणुकीची तुलना केल्यास कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र यांची गुंतवणूक 48 टक्के आहे.मात्र एकट्या महाराष्ट्राची गुंतवणुक 52 टक्के आहे. हे आकडे आरबीआयने जाहीर केलेले आहेत.
मायक्रोसॉफ्टमुळे ५० हजार नोकऱ्यांची संधी…
देवेंद्र फडणवीस म्हणाले खरे तर खरे तर महाराष्ट्राची ही प्रगती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगायला हवी होती. मात्र रोज उठून हेच नेते महाराष्ट्र मागे पडत असल्याच्या फेक नेरेटिव्हला सेट करतात. गुजरातची भोंगे लावून प्रसिद्धी करतात. आगामी काळात पुणे जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल आणि ईव्ही इन्वेस्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रात युनिट सुरू केले असून या माध्यमातून पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना येथे हिवाळी अधिवेशनातच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आमदार महेश लांडगे याचा नक्कीच पाठपुरावा करतील त्यांच्या माध्यमातून अनेक चांगले प्रकल्प या शहरांमध्ये आले आहे. रेड झोन आणि निळ्या पूररषेतील बांधकामांचा प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
जागे व्हा, छत्रपतींचे नाव घ्या. हे धर्म युद्ध आहे. एक रहेंगे तो सेफ रहेंगे एवढेच लक्षात ठेवा. आमदार महेश लांडगे यांना भरघोस मतांनी विजयी करा. महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रत्येक उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे आहे. महेश लांडगे यांना साथ पिंपरी-चिंचवडमधील उर्वरित सर्व प्रश्न मार्गी लावतो.– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
आमच्यावर कितीही आरोप होऊ दे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. तेव्हा हळहळ वाटते. फडणवीस यांनी कधीही कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा म्हणून मी घेऊन गेलेल्या व्यक्तीचे काम केले नाही. यांचे काम करतो हा आपल्याला मतदान करणार आहे का हे देखील विचारले नाही? माझ्या माय माऊलींसाठी पोलीस आयुक्तालय केले. त्याचा फायदा कोणाला होईल असा प्रश्न विचारला नाही. म्हणूनच भोसरी विधानसभेत आरोप होत असताना त्याबद्दल प्रत्युत्तर मी दिले नाही. कारण, माझ्यासमोर फडणवीस यांचा आदर्श आहे मी माझे काम करत राहणार आहे.
– महेश लांडगे, उमेदवार भोसरी विधानसभा, भाजप, महायुती.