पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी–पिंपळे सौदागर या प्रभागाचा झपाट्याने विकास झाला असून येथील लोकसंख्या एक लाखांहून अधिक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर सहकारी गृहनिर्माण संस्था असून विविध खासगी व सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये देखील आहेत. मात्र पोस्ट ऑफिससंबंधित कामासाठी येथील नागरिकांना चिंचवड किंवा औंध, पुणे येथे जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांमुळे शिवार चौक येथे २०१० साली टपाल पेटी बसविण्यात आली तसेच दर सोमवारी कुणाल आयकॉन रोड येथे पोस्ट ऑफिसची फिरती गाडी उपलब्ध करून देण्यात आली. परंतु देखील जेष्ठ नागरिक किवां महिला यांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत होते ही बाब विचारात घेता, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन नाना काटे यांनी पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यांनी परिसरातील विविध खासगी व सरकारी जागा तसेच गाळे सुचवून तेथे पोस्ट ऑफिस सुरू करण्याबाबत विनंतीपत्रे दिली व प्रत्यक्ष भेटूनही सूचना केल्या.

या संदर्भात त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट घेऊन मदत मागितली. अजितदादा पवार यांनी देखील याची दखल घेत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक सहकार्य केले. नाना काटे यांनी २०१७ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दिल्ली व पुणे येथील पोस्ट ऑफिस प्रशासनाने पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिस सुरू करण्यास सहमती दर्शविली.

त्यानुसार २०२३ पासून पोस्ट ऑफिससाठी आवश्यक कागदपत्रे व जागेची माहिती नाना काटे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पोस्ट ऑफिस विभागाला देण्यात आली. त्यानुसार पिंपळे सौदागर गावठाण येथील हनुमान मंदिरावरील हॉल पोस्ट ऑफिससाठी देण्यास महापालिकेने मान्यता दिली.

पोस्ट ऑफिस हे सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी असल्यामुळे त्याचे वार्षिक भाडे कमी असावे तसेच मिळकत करात सवलत देण्यात यावी, अशी विनंतीही मा. अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय पोस्ट विभागाच्या धोरणानुसार वार्षिक भाडे निश्चित केले. या पाठपुराव्याचे पुढील पाऊल म्हणून पिंपळे सौदागर येथील मंजूर पोस्ट ऑफिससाठी नवीन पिन कोड ४११०८३ देखील मंजूर करण्यात आला. कोणताही गाजावाजा न करता किंवा श्रेय न घेता नाना काटे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी हा पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला. काही दिवसांतच दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता लवकरच या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती नाना काटे यांनी दिली आहे.



















Join Our Whatsapp Group