जुन्नर (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मागील काही वर्षांत मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी (७ मार्च) पहिल्या टप्प्यात माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील २० बिबट्यांना गुजरातमधील ‘वनतारा’ (Vantara) केंद्रात हलविण्यात आले.

मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर व शिरूर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता केवळ ५० बिबट्यांची असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. यासाठी प्रस्ताव सेंट्रल झू ऑथॉरिटी, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

गुजरातमधील ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (वनतारा) येथील २५ सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले. त्यानंतर आज पहिल्या टप्प्यात १० नर आणि १० मादी अशा एकूण २० बिबट्यांना वातानुकूलित व सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले.

ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी आणि वाइल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने स्थलांतराची मोहीम यशस्वी करण्यात आली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.



















Join Our Whatsapp Group