पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी व लाभधारकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवना धरण प्रकल्पाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पवना धरण 98 टक्के भरले असून सध्या नदीपात्रात 4,980 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठी आवक होत असल्याने दुपारी 3 वाजता नदीपात्रातील विसर्ग वाढवून 6,500 क्युसेक करण्यात येणार आहे.

पावसाचे प्रमाण आणि धरणातील आवक कायम राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत 12,000 क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विसर्ग वाढविण्याबाबतची माहिती वेळोवेळी जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांमधील पाणीपातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.



















Join Our Whatsapp Group