पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे येथील नव्याने स्थापन करण्यात आलेले ‘रायगड’ (ज क्षेत्रीय कार्यालय) तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून आवश्यक अधिकारी, कर्मचारी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि परिणामकारक सेवा मिळाव्यात या उद्देशाने नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना केली आहे. ताथवडे येथील ‘रायगड’ (ज क्षेत्रीय कार्यालय) अंतर्गत प्रभाग क्रमांक १६, २५ आणि २६ यांचा समावेश असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण, गृहनिर्माण प्रकल्प, आयटी उद्योग आणि व्यावसायिक विकास झाल्याने लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, स्वच्छता, अतिक्रमण, सार्वजनिक आरोग्य आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या नागरी सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, संबंधित क्षेत्रीय कार्यालयात अद्याप आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पूर्ण नियुक्ती झालेली नसल्याने कार्यालयाचे कामकाज अपेक्षित वेगाने होत नसल्याचे कलाटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी इतर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागत असून त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढत आहे. तसेच तक्रारींच्या निवारणात विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे. कार्यालयात आधुनिक संगणकीय प्रणाली, उच्चगती इंटरनेट सुविधा, प्रिंटर, स्कॅनर, सर्व्हर, आवश्यक फर्निचर, नागरिकांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, डिजिटल माहिती फलक, सीसीटीव्ही व्यवस्था, अभिलेख व्यवस्थापन प्रणाली आणि इतर अत्यावश्यक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
स्नेहा कलाटे यांनी आयुक्तांकडे ‘रायगड’ क्षेत्रीय कार्यालय तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करणे, मंजूर पदांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, विविध विभागांचे अधिकारी नियमितपणे या कार्यालयातून कार्यरत राहतील यासाठी आदेश देणे तसेच नागरिकांना सर्व नागरी सेवा एकाच ठिकाणी जलद आणि सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ताथवडे आणि परिसरातील नागरिकांना अधिक प्रभावी नागरी सेवा मिळाव्यात, यासाठी ‘रायगड’ क्षेत्रीय कार्यालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे, अशी अपेक्षा नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी व्यक्त केली आहे.



















Join Our Whatsapp Group