आळंदी (Pclive7.com):- टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ.., माउली- माउली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीचा काठ..माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा.. अशा वातावरणाने सोमवारी (दि.२५) अलंकापुरी दुमदुमून गेली होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी एकादशी असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून आळंदीमध्ये दिंड्या दाखल झाल्या आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळा कार्तिकीवारीतवारीत मंगळवारी (दि.२६) आलेल्या कार्तिकी एकादशीच्या भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी सोमवारी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल झाले. इंद्रायणी घाटावर त्यांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.
पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत. टाळ- मृदंगाचा गजराने आसमंत भरून गेला असून स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. कार्तिकीसाठी इंद्रायणीला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पाण्याप्रमाणे भाविकांची भक्तीही जणू दुथडी भरून वाहत होती.
दुसरीकडे माउलींच्या मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक विधीला सुरुवात झाली होती. स्नानानंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती. यंदाच्या सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आळंदी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कार्तिकी एकादशीनिमित्त होणारे कार्यक्रम..
पहाटे १.०० वाजता : ११ ब्रम्हवृंदांच्या वेदघोषात पवमान अभिषेक व दुधारती
दुपारी १२ ते १२.३० वाजता : महानैवद्य
दुपारी १.०० वाजता : श्रींची नगरप्रदक्षिणा
रात्री ८.३० : धुपारती
रात्री १२ ते २ : श्री. मोझे यांच्यातर्फे जागर.