पिंपरी (Pclive7.com):- तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मक प्रयत्न करा. भारतीय युवकांमध्ये खूप ऊर्जा आणि क्षमता असून ते आकाशाला देखील गवसणी घालू शकतात. पुढील काळात विकसनशील भारतात युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होतील त्या संधीचे तुम्ही सोने करा असे शुभ आशीर्वाद राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी पुण्यातील युवा कलाकार ईशा अगरवाल हिला दिले.
पुण्यातील युवा अभिनेत्री व औंध, बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाची साधक ईशा अगरवाल हिने प्रियांका चोप्रा ची आई मधू चोप्रा, दीपक हारके यांच्या समवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची दिल्लीमध्ये नुकतीच भेट घेतली. यावेळी ईशा अगरवाल हिने स्वतः काढलेले “एंजल” हे ॲक्रेलिक पेंटिंग राष्ट्रपती मूर्मु यांना भेट दिले. यावेळी राष्ट्रपतींनी ईशाला शुभ आशिर्वाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
माध्यम प्रतिनिधीशी बोलताना ईशा अगरवाल यांनी सांगितले की, मी मूळची लातूरची असून उच्च शिक्षणासाठी मागील दहा वर्षांपासून पुण्यात राहत आहे. सिंबायोसिस महाविद्यालयातून एमबीए पुर्ण केले आहे. ॲक्टिंग, मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. अमेरीका, रशिया, थायलंड, युरोप मध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ब्युटी प्लेजंट मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. झोल झाल, बॅक टू स्कूल या मराठी चित्रपटासह तमिळ, तेलुगू चित्रपट काम केले आहे लवकरच मराठीतील एक वेब सिरीज लॉन्च होणार आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये पेंटिंग चा छंद जोपासला. एक वर्ष मेहनत करून एंजल नावाचे अक्रेलिक चित्र रेखाटले आणि हेच चित्र राष्ट्रपतींना भेट देण्याचे मला भाग्य लाभल्याचे ईशा अगरवाल हिने सांगितले.