पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा दैनंदिन भरणा विलंबाने करुन लिपिकाने अपहार केल्याची बाब विशेष लेखा परिक्षण अहवालात निदर्शनास आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्या लिपिकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आकाश गोसावी असे त्या लिपिकाचे नाव आहे. जिजामाता रुग्णालयात होत असलेला हा गैरव्यवहार महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणला होता. त्यावेळी खडबडून जाग्या झालेल्या वैद्यकीय विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असता, १८,६६,३८८ रुपयांचा अपहार झाल्याची समोर आले. या प्रकरणात हा लिपिक प्राथमिक चौकशीत दोषी आढळला असून त्याची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या लिपिकाने जिजामाता रुग्णालयतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील नियमावली न पाळता अनेक दुरुस्ती प्रकरण व नोंदीच्या दुरुस्ती वरिष्ठांच्या परवानगी न घेता व नियोजित कार्यप्रणालीचा अवलंब न करता अवैधरित्या करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे रखडून ठेवणे, फाइल, नस्ती गहाळ करणे, दैनंदिन भरणा न करणे, नेमुण दिलेले कामकाज न करणे, प्रकरणी वेळोवेळी सुचना व हलगर्जीपणास्तव वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देवून देखील त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याने या लिपिकावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने शाखाप्रमुखांनी शिफारस केली असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.