पिंपळे सौदागर (Pclive7.com):- सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी पिंपळे सौदागर परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे सन २०२५ चे स्वागत २०२५ रोप वाटप करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. तसेच भारतीय स्त्री शिक्षणाचा अधिकार जागृत करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ०१ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या भिडे वाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या वर्धापनदिनाचे औचित्य देखील या रोप वाटपाला होते.
पिंपळे सौदागर येथील स्व.बाळासाहेब कुंजीर मैदान, शिवार चौक, कोकणे चौक, गोविंद यशोदा चौक या ठिकाणी नागरिकांना रोप वाटप करण्यात आले. नवीन वर्षाच्या प्रसन्न सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी रोप घेत नव्या वर्षाचा झाडे लावण्याचा आणि जगवण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या, “‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभिवचन आहे. आपली भारतीय संस्कृती ही वृक्षांना नेहमीच वंदनीय मानते. तुळशी विवाह, वटपौर्णिमा या सणांच्या निमित्ताने या गोष्टीची आपल्याला नेहमीच प्रचिती येत असते. वृक्ष जगले तर आपण सर्वजण जगू आणि वृक्ष वाढले तर आपण सर्वजण वाढू याच भूमिकेतून आम्ही हा उपक्रम फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनच अवह्यातपणे राबवत आहोत. त्याला पर्यावरण प्रेमी नागरिक दरवर्षी उदंड प्रतिसाद देतात , हे बघून आमचा उत्साह दरवर्षी वाढतो आहे. आजच्या उपक्रमाचे दुसरे औचित्य म्हणजे, आजच्याच दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ०१ जानेवारी १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. फुले दाम्पत्यांनी लावलेली ही ज्योत आज स्त्री शिक्षणाची ज्वाला बनली आहे. या महान दाम्पत्यांच्या स्मृतींस मी सादर वंदन करते.”
उपक्रमाला शुभेच्छा देताना सुप्रसिद्ध समाजसेविका शारदाताई मुंडे म्हणाल्या, “आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि फुले दांपत्य सन्मान दिवस या औचित्याने उन्नती सोशल फाऊंडेशने केलेले रोपे वाटप कौतुकास्पद आहे. उन्नती सोशल फाऊंडेशन समाजकारण, आरोग्य, क्रीडा, महिला सबलीकरण, पर्यावरण अश्या चहू बाजूने, काम करत आहे. या अभिनव उपक्रमात मला सहभागी होता आले याचे समाधान वाटते. उन्नती सोशल फाऊंडेशनची वाटचाल अशीच उत्तरोत्तर दमदारपणे होत राहो अश्या मी शुभेच्छा व्यक्त करते.”
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, समाजसेविका शारदाताई मुंडे, जगन्नाथ (आप्पा) काटे, अशोक काटे, सतिश काटे, रविंद्र पाटील, संभाजी कुंजीर, राजेंद्रनाथ जसवाल यांच्यासह उन्नती सोशल फाऊंडेशन, विठाई वाचनालय आणि पिंपळे सौदागर मधील पर्यावरणप्रेमी नागरिक आदी उपस्थित होते.