पिंपरी (Pclive7.com):- म्हाळुंगे – नांदे रोडवरील बॉम्बे हाय रेस्टोबारमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना दारू तसेच हुक्का विक्री सुरू असल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी छापा टाकून ९ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांसह मॅनेजर आणि बाऊन्सर्स यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलिस स्टेशनच्या हददीतील म्हाळुंगे- नांदे रोडवर असलेला बॉम्बे हाय बार हा रात्री विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालू असतो, तसेच त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना दारू विक्री चालु असते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बावधन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांनी पोलीस पथकासह बॉम्बे हाय रायझींग द बारवर दि.१६ रोजी रात्री ०२.५० वाजता छापा टाकला. त्यावेळी बारच्या गेटवर बाउन्सर उभे होते. तसेच बारच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी गाड्या उभ्या होत्या. पोलीस स्टाफ बारच्या आत जावु लागला असता, तेथील बाउन्सर्संनी तुम्हाला आत जाता येणार नाही असे बोलुन पोलीसांशी हुज्जत घातली व सरकारी कामात अटकाव केला.

पोलीसांनी बारमध्ये प्रवेश केला असता, सदर बार नियमाचे उल्लंघन करुन आर्थिक फायद्यासाठी विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवुन बारमध्ये अंदाजे १०० ते १२५ ग्राहकांना खाद्यपदार्थ, मद्य पेय इत्यादी सुविधा पुरवित असल्याचे दिसुन आले. तसेच या बारमध्ये मोठ्या आवाजात साउंडसिस्टमवर म्युझिक चालु असल्याचे देखील दिसुन आले. त्यानंतर पोलीस स्टाफने सर्व ग्राहकांना बाहेर काढल्यानंतर संपुर्ण बारची पाहणी केली असता बारमध्ये असलेल्या टेबलवर मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बॉटल्स, ग्लासमध्ये भरलेले मद्य, इतर पेय, खाद्यपदार्थ असे साहित्य असल्याचे दिसुन आले. बारमधील एक बंद असलेली खोली उघडुन पाहिली असता त्यामध्ये १५ मोठ्या आकाराचे, १० मध्यम आकाराचे २४ मध्यम आकाराचे हुक्का पॉट, व ७२ नग हुक्का ओढण्यासाठी लागणारे पाईप मिळुन आले.

हा बार नियमाचे उल्लंघन करुन चालु ठेवुन ग्राहकांना मद्य व इतर सेवा पुरविण्यासाठी वापरात असलेला कॉम्प्युटर, म्युझिक सिस्टीम संच, सोफा सेट, कुशन चेअर, राऊंड टेबल, खुर्चा, टेबल, सी.सी.टी.व्ही.चे डी.व्ही.आर., हुक्का पॉट, असा एकुण ९ लाख ९२ हजार ७०० रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. तसेच सागर गायकवाड, सुमित चौधरी, मॅनेजर प्रतिक कांबळे, वय २९ वर्ष रा. औंध पुणे. (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) बाउन्सर यांच्या विरुध्द बावधन पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























Join Our Whatsapp Group