पिंपरी (Pclive7.com):- रेडबड मोशन पिक्चर्स प्रस्तुत अवकारीका हा पहिल्यांदाच स्वच्छतेवर आधारित महत्त्वाकांक्षी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा अधिकृत पोस्टर अनावरण समारंभ ७ मार्च रोजी पिंपरी-चिंचवड शहरात संपन्न होणार आहे.
अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजींनी नुकतीच अवकारीका टीमसोबत बंगळुरूमध्ये चर्चा केली. या चर्चेदरम्यान, स्वच्छतेसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर सिनेमा येत आहे याचा त्यांनी गौरव केला आणि सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच, आर्ट ऑफ लिव्हिंग संघटना हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आणि आशीर्वाद दिले.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजींचे अनुयायी धनराज पाटील यांनी या चित्रपटाविषयी अपार उत्सुकता दर्शवली आणि “हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, तुम्ही हे आव्हान स्वीकारले याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!” असे मत व्यक्त केले.
या वेळी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सीए अरविंद भोसले, अभिनेता रोहित पवार, लाईन प्रोड्यूसर चेतन परदेशी, विकास भोसले, साहिल भोसले यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.