पिंपरी (Pclive7.com):- साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील लांब उडीच्या मैदानाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. अकॅडमीचे प्रमुख चंद्रशेखर कुदळे यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात लांब उडीच्या मैदानातील वाळू अत्यंत कमी झाल्यामुळे खेळाडूंना दुखापतीचा धोका वाढला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण वाळू बदलून दोन्ही लांब उडीचे पटांगण योग्य स्थितीत आणावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच मैदानाच्या मध्यभागी रोलर फिरवून ते सपाट करण्यात यावे, कारण सध्या असलेल्या चढ-उतारांमुळे खेळाडूंना सराव करताना अडचणी व दुखापती होत आहेत.
महापौर रवी लांडगे यांनी या मागणीची दखल घेत लवकरच लांब उडीचे मैदान पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच पिंपरी-चिंचवडचे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उज्ज्वल करत असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.

साई स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख चंद्रशेखर कुदळे गेल्या अनेक वर्षांपासून संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक दर्जेदार खेळाडू घडवले आहेत. नुकतेच त्यांनी वर्ल्ड ऍथलेटिक्स रेफ्री ब्रांच लेव्हल परीक्षा उत्तीर्ण करत आंतरराष्ट्रीय तांत्रिक पंच म्हणून यश मिळवले आहे. यावेळी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळाडू मधुरा खांबे, प्राची अंधारे, नंदिनी कासकर, आर्यन उपाळे, प्रणव माने, हर्षल कुमार, सुरज बांगर, सिद्धेश वर्मा, सौरभ बोरसे उपस्थित होते. तसेच संदीप पालांडे यांनी या उपक्रमात पुढाकार घेत महापौरांशी संपर्क साधून खेळाडूंना सहकार्य केले असून ते नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देत विविध प्रकारे मदत करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



















Join Our Whatsapp Group