
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले आहे. पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा उचलण्यास येत्या १५ दिवसांत परवानगी दिली जाईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. आमदार शंकर जगताप यांनी बुधवारी विधानसभेत या प्रश्नावर आग्रही भूमिका घेत अर्धा तास चर्चा केली. शहरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या दृष्टीने या चर्चेला मोठे यश आले आहे.



आमदार शंकर जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंद्रा धरणाचे पाणी शहरात आणण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील ०.९५ हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याबाबत १३ मार्च २०२६ रोजी आदेश दिलेले आहे. या ठिकाणी जॅकवेल, अप्रोच चॅनेल, पंप हाऊस आणि सबस्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे आंद्राचे पाणी थेट शहरात पोहोचवण्यातील अडथळे दूर होतील. या सुधारणांमुळे पिंपरी चिंचवड शहराला अतिरिक्त पाणी मिळण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. आजच्या बैठकीत मौजे शिरे येथील जागा, शुद्ध पाण्यासाठी बॅरेज पद्धतीचा बंधारा बांधण्याची सभागृहात केलेली मागणी कायम करण्यात आली आहे .
“पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत होता. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेत या विषयावर आग्रही भूमिका मांडल्यानंतर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेत पवना धरणातून अतिरिक्त १०० ‘एमएलडी’ पाणी उचलण्यास १५ दिवसांत परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. केवळ पाणी आणणेच नव्हे, तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदी प्रदूषण रोखणे आणि आंद्रा-भामा आसखेडचे हक्काचे पाणी नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– शंकर जगताप
(आमदार, चिंचवड विधानसभा मतदार संघ)




















Join Our Whatsapp Group