पिंपरी (Pclive7.com):- पिंपळ गुरव येथे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करून व्यावसायिक वापरासाठी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

सांगवी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भाऊनगर, विश्वकर्मा मंदिराजवळ, साठ फूट रस्ता, पिंपळे गुरव येथे ही कारवाई करण्यात आली. या वेळी आरोपी गोपाळ राम अर्जुन राम विष्णोई (वय ३८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस शिपाई आकाश दत्तात्रय खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या लोखंडी पाईपच्या साहाय्याने दुसऱ्या रिकाम्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरत होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असूनही कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा आणि संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे बेकायदेशीर आणि धोकादायक प्रकार आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी.



















Join Our Whatsapp Group