पिंपरी (Pclive7.com):- घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका २१ वर्षीय तरुणाने मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी सहा वाजता संत तुकारामनगर येथे घडली.
सुजल संजय मनकर (२१, रा. राजगुरुनगर) असे मृताचे नाव आहे. सुजल बीसीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी संध्याकाळी सुजलने संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. काही वेळ तो तिथे उभा राहून विचार करत होता. अचानक त्याने थेट खाली रस्त्यावर झेप घेतली. दुर्दैवाने, खाली पडताच एका भरधाव वाहनाने त्याला चिरडले. स्थानकावरील नागरिकांनी ही धक्कादायक घटना प्रत्यक्ष पाहिली. काहींनी सुरक्षारक्षक आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
सुजलने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. या घटनेचा तपास पिंपरी पोलिस करत असून, सुजलच्या आत्महत्येमागे आर्थिक अडचण असल्याचे कारण चिठ्ठीत नमूद असले तरीही नेमके कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group