पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म जिल्हा असल्याने काँग्रेस नेत्यांकडून कायम दुर्लक्ष होत असल्याची व्यथा पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रांत अध्यक्ष समोर मांडल्या. आज काँग्रेस भवन पुणे येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आणि अपेक्षा व्यक्त केल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्ता आढावा बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड अशा काँग्रेस कमिट्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन आणि नंतर तिघांचाही संयुक्त मेळावा घेऊन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांची मते, संघटना वाढीच्या सूचना, आगामी निवडणुकांच्या बाबतीमधील असणारे विचार जाणून घेतले.
यामध्ये कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त करताना विविध बाजूंनी प्रदेशअध्यक्षांचे लक्ष हे शहरातील आणि संघटनेतील प्रश्नांकडेही वळवण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने यामध्ये स्व.रामकृष्ण मोरे सर गेल्यानंतर या शहराला सक्षम नेतृत्व नाही, सत्तेत असताना शहरातील प्रश्नांकडे आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आणि राष्ट्रवादीचा जन्म जिल्हा असल्याने या ठिकाणी लक्ष द्यायला काँग्रेसचे वरिष्ठ धजवत नाहीत अशी भावना जनसामान्यात असल्याने काँग्रेसचे अतोनात नुकसान झाले अशाही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तसेच निवडणुका महाविकास आघाडी समवेत लढल्या जाव्यात अशी, तर काहींनी निवडणुका स्वतंत्र लढल्या जाव्यात असाही सुरा आवळला.
कुदळवाडी येथे झालेली सुमारे एक हजार एकर वरची कारवाई, टँकर माफिया राज, एसआरए मधून सुरू असणारी दादागिरी, अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न, मनपा मधील बेसुमार भ्रष्टाचार, या अशा इतरही प्रश्नांवर या पुढील काळात जोमाने काम करूया यासाठी आपण मार्गदर्शन करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली. सर्व प्रश्नांना आणि सर्व बाजूना सकारात्मक प्रतिसाद देत सपकाळ यांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली आणि एक नवा उत्साह नवचैतन्य देण्याचे काम पहिल्याच बैठकीत केले.
या बैठकीस काँग्रेसचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने कैलास कदम, गौतम आरकडे ,शामला सोनवणे, नरेंद्र बनसोडे, बाबू नायर, सायलीनढे, कौस्तुभ नवले, उमेश खंदारे, किरण खाजेकर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, गौरव चौधरी, मयूर जयस्वाल, शहाबुद्दीन शेख, भरत वाल्हेकर, रवी नांगरे ,विजय ओव्हाळ, जितेंद्र छाबडा, सोमनाथ शेळके, आबा खराडे, महादेव वाळुंजकर, महेश पाटील, राहुल शिंपले आदि पदाधिकारी आणि इतरही बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group