पिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रोने पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्कृष्ट सेवेसाठी असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. मेट्रो कर्मचाऱ्यांची सतर्कता, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा आणि चोख संवाद व्यवस्था (TETRA) यांच्या प्रभावी समन्वयामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांचे हरवलेले मौल्यवान सामान अवघ्या काही मिनिटांत शोधून त्यांना सुखरूप परत करण्यात आले.

२.५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग अवघ्या ३० मिनिटांत परत
स्वारगेट मेट्रो स्थानकाचे सुरक्षा पर्यवेक्षक दीपक हजारे यांनी सुरक्षा नियंत्रण कक्षाला माहिती दिली की, प्रवासी अमृता राजेश राठोड यांची काळ्या रंगाची बॅग दुसऱ्या एका हुबेहूब दिसणाऱ्या बॅगेसोबत चुकून बदलली गेली आहे. संबंधित बॅगेमध्ये सुमारे २.५ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Sr. DGM) कुलकर्णी यांनी तातडीने शोधमोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले. पुणे रेल्वे स्टेशन मेट्रो स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बॅगेज स्कॅनिंगदरम्यान बॅगांची अदलाबदल झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात दुसरी प्रवासी अस्मिता ही बॅग घेऊन रामवाडीच्या दिशेने गेल्याचे आणि कल्याणी नगर स्थानकावर उतरल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित प्रवासी पुन्हा पुणे रेल्वे स्टेशन येथे परतल्याचे समजताच पीआरएस पर्यवेक्षक दशरथ मुंजाल यांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. सुरक्षा व्यवस्थापक अतुल दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या शोधमोहीमेत अवघ्या ३० मिनिटांत यश मिळाले. सायंकाळी ६.३० वाजता दोन्ही प्रवाशांना स्टेशन कंट्रोलर कार्यालयात बोलावून त्यांच्या बॅगा सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आल्या. या मोहिमेत व्यवस्थापक (सुरक्षा) अतुल दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक विजय भोसले, हनुमान काळे आणि सीसीटीव्ही ऑपरेटर भारत भोईर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

रामवाडी स्थानकावर हरवलेले पाकीट १९ मिनिटांत मिळवून दिले
दुसऱ्या घटनेत रामवाडी मेट्रो स्थानकावर सकाळी ६.३२ वाजता एका प्रवाशाचे पाकीट तिकीट काउंटरवर विसरले गेले होते. हे पाकीट चुकून दुसऱ्या प्रवाशाने उचलले. प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यानंतर मूळ प्रवाशाला आपले पाकीट हरवल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ ग्राहक सुविधा सहाय्यकाकडे तक्रार केली. तक्रार मिळताच ग्राहक सुविधा सहाय्यकाने स्टेशन कंट्रोलर यांना माहिती दिली. स्टेशन कंट्रोलर यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पाकीट घेतलेल्या प्रवाशाची ओळख पटवली. ट्रेन अद्याप सुटली नसल्याने स्टेशन कंट्रोलर आणि सुरक्षा रक्षक यांनी तातडीने ट्रेनमध्ये जाऊन संबंधित प्रवाशाकडून पाकीट हस्तगत केले.

सकाळी ६.५१ वाजता, अवघ्या १९ मिनिटांत पाकीट मूळ मालकाला परत करण्यात आले. मेट्रो कर्मचाऱ्यांच्या या तत्पर आणि कार्यक्षम कामगिरीबद्दल प्रवाशाने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या कारवाईत स्टेशन कंट्रोलर भूषण लोखंडे, सुरक्षा रक्षक विश्वास लेकावळे आणि ग्राहक सुविधा सहाय्यक अवधूत खांडवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पुणे मेट्रोच्या या दोन्ही घटनांमधून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची दक्षता, जबाबदारी आणि सेवाभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.




















Join Our Whatsapp Group