पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे सौदागर येथे कारवाई करीत एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे सहा लाख किंमतीचा १० किलोहून अधिक गांजा जप्त केला.

सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्पे, विजय दौंडकर हे (दि.२०) रोजी सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पिंपळे सौदागर येथील प्रथम रेस्ट्रो बार समोर एकजण टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवर संशयास्पदरीत्या थांबलेला दिसला. पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने आपले नाव हरिश मगन सोनवणे (वय २७ वर्षे, रा. काळभैरवनगर, यशस्वी हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र. १२, पिंपरी गाव, पुणे, मूळ रा. मौजे शिरपूर, वरवाडे, संत सावतामाळी चौक, ता. शिरपूर, जि. धुळे) असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली.
झडती दरम्यान त्याच्याकडे असलेल्या सॅकबॅग आणि ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये एकूण १० किलो १३८ ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी मिळून आली. पंचासमक्ष हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ५ लाख ८८ हजार ९०० रुपये असल्याचे आढळले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उपनिरीक्षक धनंजय खेडकर, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्पे, विजय दौंडकर, रवींद्र जाधव, दीपक भोसले, संदीप शेळके, प्रदीप गायकवाड, अमोल कांबळे, संतोष माळी आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group